28 July 2024

बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब लागत नाही

 दोन मिनिट वेळ असेल तर जरूर वाचा..

दिनांक:६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनी महानगर पालिकेने काढलेली पुस्तिका, यात अभिवादन पर कव्हर पेज वर हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल जरूर वाचावं.


उणेपुरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य, त्यात ३० वर्षे शिक्षणात आणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबांना चळवळ आणि लेखनाला...

त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, २३ ग्रंथ लिहितो,

शेकडो लेख लिहून

भाषणे करत राहतो.

मनुस्मृती दहन, चवदार तळे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करुन निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास...

वाचन लेखनावरची पकड सुटू न देता...

हे सारे सारे कसे जमवले असेल याचा हिशोब लागत नाही...

आजच्या नेत्यांसारखे विमान, हेलिकॉप्टर हाताशी नाही, मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही, अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही...

खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर

कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे...

पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा, ती सारी माणसे टेक्नोसॅव्ही नसणारी...

फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेली

त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असे

?की ज्या शब्दांनी गावाच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी

पकडू शकली...

न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातील माणसांची...

नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,

आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात

कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत......

कोसो दूर....

कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब?

- हेरंब कुलकर्णी अकोले, जि. अहमदनगर

No comments:

Post a Comment

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...