06 December 2022

तारळी धरणात लुप्त झालेली गावं आणि संस्कृती:-

 तारळी धरणात लुप्त झालेली गावं आणि संस्कृती:-













डांगीष्टेवाडी, दुडेवाडी, निवडे, सावरघर, भांबे आणि कुशी ही पाटण तालुक्यातील गावं तर करंजोशी, बोपोशी आणि खालची पवारवाडी ही सातारा तालुक्यातील गावं.

90 च्या दशकापासून धरण होणार अशी आवई आणि गोवागावी चर्चा होती, माण खटाव चा दुष्काळी भागाला पाणी मिळावे अशी तेथील स्थानिक नेतृत्वाची मागणी होती तसेच कृष्णा खोरे पाणी वाटपाचा तंटा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश केंद्रीय लवादासमोर गेला आणि युती शासनाच्या काळात आपल्या राज्याच्या वाट्याचे पाणी अडवण्यासाठी कृष्णा खोऱ्यात धरणे बांधण्यासाठी जोरदार तयारी झाली.


तारळी धरणाच्या जागेची चाचपणी करताना चार ठिकाण चर्चेत आली पाहिलं धुमकवाडी दुसरं आता आहे तिथं तिसरं फणसकडा म्हणजे सावरघर आणि निवडे च्या मध्ये तर चौथ भांबे आणि करंजोशी च्या मध्ये, प्रकल्प पाणी साठा पुनर्वसन आणि तालुक्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन सारासार विचार करून आहे ते ठिकाण ठरलं.

1997 साली तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त अरुण भाटिया साहेब, सातारा जिल्हाधिकारी श्रीमती वंदना खुल्लर मॅडम आणि पुनर्वसन जिल्हाधिकारी जोतिबा पाटील साहेब, महाराष्ट्र शासनाने या अधिकारी वर्गावर धरणाचे काम चालू करण्याची जबाबदारी टाकली.


त्या अगोदर साधारण 1992-93 च्या दरम्यान प्रथम धरण क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी भुगर्भात दगडाचा थर आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी मशीन लावल्या गेल्या, आम्ही मुरुड ला शाळेला जाताना रस्त्यात या मशीन लावलेल्या दिसत, तिथं काम करणारी मंडळी बहुतेक मराठी न्हवतेच त्यांची भाषा कन्नडी कामगारांनसारखी होती त्यामुळे हे काय काम चालू आहे आणि का करतायत याची माहिती लागत न्हवती, नदीवरून पाण्याचे कॅन भरून घेऊन येत, त्या मशीन ला डिझेल वरच इंजिन होतं, बोअर मारतात त्यासारखी 2-3 इंचाची पोकळ पाईप होती, ती फिरत फिरत भुगार्भात जात होती, साधारण 10 फूट खोल गेल्यावर लाल दगड लागत होता त्यानंतर काळाकुट्ट दगडाचे ठोकळे आम्हाला तिथे काढलेले येता जाता दिसत, हे सर्व काम इतके गुप्त पणे केले जात होते की भागातल्या लोकांना पुढं काय वाढून ठेवलंय याची कल्पना सुद्धा न्हवती.


सर्व काही शासनाच्या मनासारखं घडत होतं, आमची साधी भोळी माणसं मात्र या सर्वापासून अनभिज्ञ होती.

हळू हळू 1996 ला भूसंपादन अधिकारी धरण बांधकाम करणारे कृष्णा खोरे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या गाड्या विभागात फिरू लागल्या लोकांना कामाची चाहूल लागली, प्रथम प्रशासकीय अधिकारी गावात फिरायला खूप घाबरत होते कारण त्या अगोदर कोयना धरण झाले होते तिथली 105 गावं उठून त्यांची वाताहत झालेली सर्वांच्या कानावर होती, खूप हाल सोसले कोयनेतील प्रकल्पग्रस्थांनी, संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज दिली राज्याच्या विकासात वरदान ठरले हे धरण पण तिथल्या लोकांचे झालेले हाल खूप भयानक होते निम्याहून जास्त गावं रायगड ठाणे जिल्ह्यात आणून टाकली ना त्यांची कसली सोय ना जमिनी ना घरे, इथल्या लोकांचे काही संबंधित पै पाहुणे आमच्या विभागाशी संबंधित होते आणि ही सर्व परिस्थिती आमच्या माणसांना माहिती होती पण शिक्षण कमी बाहेरील जगाचा अनुभव नाही भाग सोडला तर त्याकाळी मुंबई मध्ये राहणारे आमचे बापजादे जवळजवळ सर्वच मिल कामगार, बायका पोरं गावाला आणि ही पिढी मुंबईत कामगार म्हणून बैठकीच्या खोलीत राहत असत, प्रत्येक गावाचे एक दोन सार्वजनिक गाळे डिलाईल रोड घोडपदेव आणि दक्षिण मुंबई मध्ये होते, मोजके कामगार आपल्या कुटुंबासहीत मुंबई मध्ये राहत होते आणि मग हे कुटुंब आपल्या गावातील आणि नातेवाईक यांना खाणावळी घालत असे.


दरम्यान विभागीय आयुक्त अरुण भाटिया साहेब यांचे नाव असलेले परिपत्रक प्रत्येक गावाच्या चावडीवर तसेच संबंधित तलाठी कार्यालय तारळे आणि मंडलअधिकारी तारळे (हे कार्यालय आता तलाठी तारळे तलाठी कार्यालय आहे त्या ठिकाणी जुनी माडीची इमारत होती तिथं तळमजल्यावर सर्कल ऑफिस आणि माडीवरून चढून वरच्या मजल्यावर एका बाजूला तलाठी तर दुसऱ्या बाजूला तारळे ग्रामपंचायत ऑफिस होते, आता त्या ठिकाणी नवीन इमारत बांधली आहे) येथे लावणेत आले त्या त्या गावातील लोकांना अधिकारी हे दाखवू लागले जणू ते पत्रक म्हणजे कायदा आहे असे भासवले त्या पत्रकातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:-

1) सर्वांना बुडीत जमीन आणि कुटुंबातील लोकसंख्या प्रमाणात 2-5 एकर जमीन मिळणार 

2) संपूर्ण जमिनाला 12 माही पाणी मिळणार आणि सर्व जमिनी कसलेल्या आणि कसदार असणार 

3) भूमिहीन यांना एक एकर जमीन मिळणार 

4) सर्वाना सर्व सोयीयुक्त गावठाण आणि घरे मिळणार 

5) आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनवणार 

या अश्याप्रकारे आयुक्त यांचे नावाने अनेक पत्रके काढून प्रकल्पग्रस्थ यांना विश्वासात घ्यायला सुरवात केली.

पुनर्वसन जिल्हाधिकारी जोतिबा पाटील यांनी आपली चानाक्ष नीती वापरून लोकांना विश्वासात घ्यायला सुरवात केली, धरणाच्या भिंतीजवळ रस्त्यावरचं पहिलं गावं डांगीष्टेवाडी असलेने एकदा अधिकाऱ्यांची गाडी गावात येताच तिथल्या आणि करंजोशी गावातील महिलांनी कृष्णा खोऱ्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला त्यांना शेणाचा मार खाऊन परत जावं लागले, पुढे जोतिबा पाटलांनी चाणक्य नीती वापरून काही प्रकल्पग्रस्थांना विश्वासात घेऊन धरणाचा नारळ मे 1997 ला फोडायला भाग पाडलं.


लाल माती, घनदाट झाडी, आंबे फणस उंबर जांभूळ ऐन नाना करवंदी फळबाग आणि रानमेवा असलेली ही संपूर्ण जमीन, बारमाही डोंगरातून ओढ्या नदीतून वाहणारे पाणी, त्यावर आडवे पाट काढून बारमाही बागायत अशी शेती, भात गहू नाचणी भुईमूग ज्वारी आणि सर्व माळवं डाळवं इथं विपुल पिकत होत, भाताचं कोठार म्हणून या गावांना ओळख होती, संपूर्ण शिवार हिरवागार, भाताची सुगी झाल्यावर गहू आणि भुईमूग, मका उन्हाळी पीक, फार कमी खर्चात नैसर्गिक शेती इथलं पाणी डोंगर कपारितून आलेलं त्यामुळं त्याची शुद्धता आणि चव अप्रतिम, पिण्याचे पाणी डोंगरातून नळाने किंवा गावाशेजारी ओढ्याकाठी झरा असायचा, इथली हवा शुद्ध आणि एखाद्या रोग्याला औषधावीणा बरी करणारी.

ही गावं म्हणजे आपसातले सर्व पाहुणेच की, इथले बहुतेक रोटी बेटी चे संबंध एकमेकात गुंतलेले, मुरुड आणि पाच वाड्या, मालोशी, तोंडोशी हीच सर्व पाहुण्यांची गावं, ही गावं एक दुसऱ्याचा इतक्या जवळ की निरव शांततेत एका गावातून मारलेली हाळी दुसऱ्या गावात ऐकायला जायची.....

प्रत्येकाच्या घरी दूध दुभती जाणवरं म्हैस गाय शेळ्या मेंढ्या शेतीसाठी बैलजोडी, घरात जणावरांचा गोटा या संपदेने भरलेला, अमाप डोंगर चरण्यासाठी आणि चरिवासाठी त्यामुळं घरात दूध दही लोणी कोणताही तोटा नाही,


सर्व गावच्या जत्रा संपल्या की शेतात बैलगाडीनं शेणखत टाकायचं, झाडांच्या पालापाचोळा जाळून तराव करायचा, मुरुड नाहीतर बांबवडे च्या सुताराकडून शेतीची अवजारं तयार करून दुरुस्ती करून घ्यायची बहुतेक सर्वच अवजारं ही लाकडापासून बनवलेली, पाऊस चालू व्हायच्या आधी तारळ्याचा बाजार करून संपूर्ण पावसाळ्यात लागणारा बाजार हाट करून ठेवायचा त्यानंतर गौरी गणपतीच्या बाजाराला माणसं तारळ्याला जायची कारण नदी नाले ओढे भरून आल्यावर बहुतेक जाणं येणे बंदच होत असे, जेष्टात पहिला पाऊस पडला की भात नाचणी पेरणीआणि खरीप पेरणी करायची.

पाऊस वाढला की ओढा नदी नाले सर्व दरारून आवाज देत वहात असत, चढाला चढणारे गढूळ पाण्यातील मासे पकडायचा एक वेगळाच आनंद असे, पाऊसात अंगावर घोंगड इरल पोत्याची कागदाची खोळ, बेफाम पाऊस आणि ओसंडून वाहणारे लाल भडक ओघळ ओढे नदी, सर्व शिवार पाणीच पाणी.


पेरणीपासून साधारण 3 आठवड्यानी भाताची लावण चालू, पैरेकरी वाटेकरी हे सर्व आधीच ठरल्याल, पैशाची देवाणघेवाण फारच कमी पैऱ्याची शेती, लागनीला एक महिना लागायचा, बेंदूर यायच्या आत बाहेर भात लागण पूर्ण करायची, बेंदूर सणाला बैलजोडी सजावट गावातून देवळाला मिरवणूक जणू काही पर्वणीच.


हिरवीगार डोंगर झाडी शिवार, चरायला जाणारी जनावर तृप्त होऊन घरी परतायची, श्रावण महिन्यात भजन कीर्तन देवळात श्रावणी सोमवार तेल वात, भात कोळपण खरीप भांगलन करीत भाताचा हिरवागार शिवार नजरेत भरण्यासारखा, शाळेत जाणारी पोर कधी ओघळ ओढे तर कधी नदी ओलांडून मुरुडच्या शाळेला जात असतं. या सर्वच गावात चौथी पर्यंत शाळा होती माध्यमिक शाळा मुरुड ला. कधी हट्ट म्हणून जोरदार पाणी आणि प्रवाह नदीला ओढ्याला असताना पाण्यातून पोहून पार करायचं नडगे गुडघे फुटायचे पण माघार नाही, पाण्याच्या लाटावर स्वार होऊन महापूर पार करायचा आणि जिद्द पूर्ण करण्यासाठी असं अनेकवेळा घडायचं, शाळेत असल्यावर बाहेर किती पाऊस पडतोय नदीला किती पाणी आहे याचा अंदाज येत नसे, कधी कधी वरती खोऱ्यात पडलेला पाऊस जास्त असे आणि त्यामुळे नदीला येणारे पाणी याचा अंदाज लागतनसे तरीपण त्यातून आपली जिद्द करायचीच.

डोंगर शेताचे बांध चारा विपुल सकाळ संध्याकाळ जाणवरांना चाऱ्याच वझ डालग्यातनं गुराकडन येताना डोक्यावर असायचं, जनावर टूम फुगलेली पांदीचा चिखल तुडवीत कडूस पडताना घरी यायची, हाच काळ जाणवरांना बाळ होण्यासाठी कुणाच्या म्हशीला रेडा/रेडी झाली तर कुणाच्या गाईला कालवड/खोंड झाला अश्या गोष्टी खरवीज आणि चीक वाटून आनंद साजरा होत असे, त्याकाळात दुधाची डेरी न्हवती, कळशी हंड्यानं दूध घरी असायचं त्याकाळात काही ठिकाणी खावा करणारा भय्या असायचा त्याला खावा करण्यासाठी दूध घालून त्यातून पैसा अडका उभा राहायचा, लोणी तूप सर्वच कसं बक्कळ उपलब्ध असायच.


गौरी गणपती सणवार जवळ आल्यावर प्रत्येक गावाचा कुंभार मुरुड मध्ये ठरलेला, गावातली पोर मोठी मानस कुंभाराच्या घरी जाऊन आपल्या नावाची चिट्ठी टाकायचे आणि भाताच्या पायलीवर एक पायली पासून आठ पायल्या पर्यंत गणपतीची मूर्ती असायची, गणपती ची सजावट नैसर्गिक दवण्यापासून बनवलेली कडी, जुन्या वह्या पुस्तकं पान फाडून नाचण्याच्या खळी पासून कागदाचं तोरण बनवायचं, कुणाचा फळीवर आडव्या फळीवर बसवलेला गणपती तर कुणाचा टिपावर दिवळीत पण त्या आराशीचा आनंद आजच्या सजावटीला कुठला!, गौरीला फुलवरा लहान तरुण मुली डोंगर कपाऱ्यात जाऊन आणत, नांदायला गेलेल्या मुली आपल्या माहेरी या सणाला हमखास, झिम्मा फुगडी महिला वर्गाला आनंद देणारे दिवस, प्रत्येक गावाला वाज्नत्री होते, सनई सुरात गौरी गणपती आणि अनंत चतुर्थी चे विसर्जन भरून वाहणाऱ्या नदीकाठी होत असे.


दसरा म्हनजे पोटऱ्यात आलेली भात आणि सर्व पीक अक्का शिवार हिरवाइने नटलेला, पाऊसकाळ कमी होत असताना आडव्या पाठाच पाणी आणण्यासाठी धरणं काढायची म्हणजे पाठांची साफसफाई करायची आणि ओढ्या नदीला दगड चिखल मातीचा आडवा बांध धरायचा, प्रेत्येक घरातणं एक दोन मानस खोरी कुदळ घम्याल घेऊन गावानं एकत्र जमून हे काम करायच आणि ओढ्या नदीला खळखळनार काही अंशी पाणी आडव्या पाठानं शेतात, त्या पाटात पाण्याबरोबर आलेले छोटे छोटे मासे पाटात वरतून खालती आणि खालतून वरती खेळत असत हे बघायची वेगळीच मजा, दसऱ्यात देवळात नवरात्री उपवास, कबड्डी खेळण्यासाठी गावातली सर्व पोरं रात्री देवळात याची, देऊळ भरून माणसं, खारीक खजूर काकडी दही असा फराळ.


सुगीच्या दिवसाची चाहूल लागताच गावोगावी पालजत्रा व्हायची, सर्व शिवार भात पिकानं पिवळा गर्भरीत होत चाललेला, पिकाच्या लोंब्या ओतंबून झुकलेल्या हवेवर हळुवार डोलताना, गावाशेजारी शेतात खळी काढायला सुरवात, सवरीचा तिवडा आणून मधोमध उभा करायचा बाजूनं चारा तासून जमीन धोपटून तिवड्याला जनावरं फिरवून चेपून घ्याची, शेणकाला करून खळ सारवून घ्यायचं, शिवारात भात कापून भाताचे भारे मोळापासून बनवलेल्या यटीवर बांधून झाप झाप करत खळ्यावर आणायचे, डोंगरावरच्या वाड्या वस्तीवरची माणसं मदत करायला यायची, जातान त्यांना मोजून न्हवे तर सुपान भात घालायचं, तो रोजगार न्हवता तर ते प्रेम आणि आपुलकी होती, किती गेलं किती राहिलं याच कधीच माप होत नसे, धान्य सुपातून वाऱ्याला देऊन भली मोठी रास लागायची, बैलगाडीन पोती भरून घरी आणायचं, हळूहळू अक्खा शिवार मोकळा होताना घरात टोपली भरून शिल्लक राहिलेलं धान्य पोत्यात पडवीला तसंच, टोपल्याच माप 4 मनापासणं ते 10 मनाची टोपली, टोपल्यांची घरात लाईन लागलेली असे.

दिवाळी ला शाळेला सुट्टी, पहिल्यादिवशी पहाटे कऱ्याट पायाखाली फोडून अंगोळ, नवीन कपडे फटाके टिकल्याची डब्बी दगडावर ठेवून नाहीतर कानशीत पकडून वाजवायची, सुतळी बॉम्ब, अक्खा गाव शिवार डोंगर सकाळ दुपार संध्याकाळ फटाक्यांचा आवाज येत असे, कानावलं लाडू शंकरपाळी अनारसं गोडधोड ला तोड न्हवती, बारा दिवसांन वाघबारस सर्व पोरा पोरींनी घरातणं अंडी बोंबील बटाटा चटणी मीठ त्याल भांडी घेऊन डोंगरात जायचं, शिवरीच्या भल्या मोठ्या झाडाखाली पाण्याच्या शेजारी स्वैपाक बनवून एका मोठ्या पोराला अंगाला तोंडाला राख लावून वाघ बनवायचा आणि अख्या शिवार भर ताणायचा, भुईमूगाच्या शेंगा आणि चवळी मका कणीस तोडून शिजवायच्या, जेवण करायचं आणि संध्याकाळी गुरं घेऊन घरी.


मोकळा झालेला शिवार भाताचा सड पाजून दोन तीन दिवसानंतर गहू पेरणी बैल नांगर पाट्याळ चिरं वढून वावार एकदम मस्तच करायचं, भुईमूग कुरीन फनून चाळून शेंगा चाळायच्या एकमेकांना मदत करून शेंगाच वाटं व्हायचं टोपली भरून राहिलेल्या शेंगा चा घाना गाळून तेल आणि पेंड घरी यायची, भावकी वर बारी ठेऊन प्रत्येक भावकीला त्यांच्या एकूण हिस्याप्रमाणे पाणी, 2-3 आठवड्यानी पाणी पाळी द्याची, गव्हात येणारी चिलची भाजी त्याची अप्रतिम चवं, डोंगरातलं गवत कापायला सौंदा सांगायचा, आणायला गावातील सर्व गडी एकत्र मिळून पाहुनोरावर खळ्यावर आणून गंज लावायची, बैलांना मांडव करायचा, आजूबाजून ताट्या लावून दावन तयार करायची, पेंढ पाला करीत आनंदाने दिवस निघत जायचे.


हिवाळ्याचे दिवस, गल्लीत दारात प्रत्येकाने मुरूम टाकून भुई सारवलेली आजच्या टाईल्स आणि मार्बल ग्रेनाईट ला फिकी पडणार ते तुळतुळीत शेणाच सारवाण थंडीत ऊबदार आणि गर्मीत थंडावा देणारी भुई, कडूसं पडताना खेळलेली लपाछपी खो खो लंगडी, समाज मंदिर, पार, गल्ली, लाकडाचा माचा अंगणात त्या माच्यावर चांदण्या रात्री बसून आईनं बनवलेलं चिलची भाजी आणि भात खाल्लेला त्याची चव आणि आठवन कधीही न जाणारी, नदीला पाणी कमी होत असताना रात्री बत्तीने, जाळ्याने मारलेले मासे, ओढ्यावर नदीवर किवटं करून तर कधी ह्यार धरून मासे पकडायचे.

पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच एसटी बंद ते सुगी झाल्यावर चालू, गावानं एकत्र मिटिंग घेऊन रस्ता बनवायला घरटी माणसं नेमायची बैलाची औत नांगर खोरी कुदळी टिकावं घेऊन नदीच्या उजव्या बाजूनं सावरघर पासून बांबवडे तर डाव्या बाजूनं बोपोशी पासून मुरुड ओढ्या ओघळातून दगड माती भरून रस्ता तयार झाल्यावर एसटीला पत्र देऊन सावरघर आणि बोपोशी एसटी दिमाखात भागात फिरायची.

1990 च्या अगोदर पडद्यावर चे पिच्चर, पाली उंब्रज ला जाऊन पिच्चर ठरवायचा त्याची पोस्टर घेऊन लहान तरुण आजूबाजूच्या गावात बॅटरीच्या लाऊडस्पीकर वर बैलगाडीतून प्रचार करायचा “ऐका हो ऐका आज रात्री…………. मुक्कामी ठीक साडे नऊ वाजता 12X10 च्या पडद्यावर मोहित्याची मंजुळा हा सिनेमा दाखवणार आहे, तिकीट दर 2 रुपये, अक्का मावशी काकी काका सर्वांनी जरूर बघा, याल तर हसाल न याल तर फासाल उद्या शेजारणीला इचरित बसाल! कसा होता रातचा पिच्चर………..” ती रिळ वर फिरणारी मशीन पडदा कणात सर्व काही मजेशीर, 1990 च्या नंतर व्हिडिओ व्हिसीअर आला तारळ्यात जाऊन ठरवायचा मुक्कामी एसटीनं मुरुड पर्यंत तिथून पुढं 4-5 पोरं व्हिडिओ डोक्यावर घेऊन गावात कुणाच्या बारश्या निमित्त तर कुणाच्या लग्नाच्या पूजे निमित्त आजूबाजूच्या गावात खबर लागायची, जेवून झाल्यावर एकत्र पारावर जमायचं स्वेटर शाल बुरणूस अंगावर हातात चार्जिंग वरची ब्याटरी, पायात नॅशनल ची स्लीपर नदीच्या खळखळत्या पाण्यातून कधी कधी धारला लागली म्हणजे एका पायातली गेली आता दुसऱ्या पायातली काय करायची? नदी तून अलीकडं पलीकड करायचं गार पाणी लागून थंडीन हात पाय फुटायचं पण पिच्चर सोडायचा न्हाय, रात्रभर 2-3 पिच्चर बघायचं कधी कधी कामानं अभ्यासांन कंटाळा आल्यावर तिथंच झोप लागायची, पिच्चर संपल्यावर जाग यायची आणि परत पहाटेच कडाक्याच्या थंडीत पारावर येऊन ऊबदार वाकळत पडायचं.


भागातल्या जत्रांची चाहूल लागायची, देवळा जवळच्या शिवरीच्या मोठ्या झाडाला लाल फुलं आली की जत्रा जवळ आली समजायची, महाशिवरात्री झाली की सावरघर लगेच डांगीष्टेवाडी, गुडीपाडव्याला कुशी, रामनवमी ला निवडे आणि बोपोशी, लगेच करंजोशी मालोशी तोंडोशी आणि शेवटी मुरुड, प्रत्येक गाव महिनाभर अगोदर जत्रची मिटिंग घेणार कमिटी नेमणार देवळाच्या अवती भवती सफाई साठी अक्खा गाव, वर्गणी बसवून तमाशा ठरवायला सकाळच्या एसटीनं माणसं जायची आणि मुक्कामाला परत, प्रत्येकगावात, घराच्या भिंती राखनं सारवून दर्शनी भिंतीवर लाल चुनखडी चा कलर, जत्रला नवीन कपडे मुरुड मध्ये हारीशिंप्या कडनं शिवून घ्यायची, नदीवर वाकळा धुवायला सार गावं एकत्र, जत्रत उभा करायला लाकडी झुला, त्याची 5 पैश्यापासून तिकीट, आदल्या दिवशी सकाळ पासून वाण्याची दुकान हजर, गट्ट्या खेळायला खूप मजा, नदीच्या ढूवावर पोहून अंगोळ करून जत्रला तयार, आजूबाजूच्या गावातन देवाच्या काठ्या यायच्या, गोडीशेव जिलेबी चिवडा, लाल भडक गारीगार नुसती मज्जा, कुस्तीचा फडावर कांड बत्तास, नारळ, दोन रुपये, पाच, दहा वीस एक्कावंन आणि एकशे एक अशी कुस्ती बक्षीस, वर्षभर आतुरतेने वाट बघित असलेली जत्रा कधी लगेच संपून जायची आणि पुढल्या जत्रची वाट बघायची.


आंब्या फणसाचा मोसम सुरु, जांभूळ करवंदी आळु दोन महिने खूप सारी मज्जा, झाडावर बसून आंबे फणस जांभूळ खायचं, अक्खा शिवार गहू केलेला, गव्हाची काढणी झाली की शेत नांगरून पुढच्या हंगामासाठी तयार……

असं सर्व असताना 1997 साली कामाला सुरवात केली प्रशासनाने साम दाम दंड भेद सर्व कुटनीतीचा वापर केला आणि कामाला सुरवात केली, नोव्हेंबर 1997 ला स्थानिक मुंबईकर मंडळी नी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाण्याचे ठरवलं, प्रत्येक गावात दवंडी देऊन बायका मुलांना घेऊन आणि मुंबई वरून दोन ट्रॅव्हल्स भरून सकाळी सातारा जुना बोगदा येथे जमा झालो मी त्यावेळी 13 वी ला मुंबई ला कॉलेज ला होता आणि त्या ट्रॅव्हल्स नी जाऊन मोर्चात उपस्थित होतो, आमच्या मोर्चा सोबत उरमोडी धरणाचे प्रकल्पग्रस्थ सुद्धा होते, दोन्ही धरणातील सर्व प्रकल्पग्रस्थ सातारा जुन्या बोगद्या पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायी मोर्चा झाला मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यात अनेक प्रमुख मागण्या समोर आल्या पण नंतर च्या काळात प्रशासनाला जे करायचं होतं ते त्यांनी केलंच.


प्रथम पायातली गावं डांगीष्टेवाडी आणि दुडेवाडी येथील लोकांना काही पैशाची भरपाई देऊन आणि काही पोकळ आश्वासने देऊन उठून जाण्यासाठी भाग पाडले, धरणाच्या भिंतीची जागा मोकळी झाल्यामुळे कामाला जोराने सुरवात झाली, मोठमोठ्या जेसीपी पोकलँड क्रेन लागली, अनेक डंपर आले, प्रसाद, सोमा, के के आर, अरविंद अश्या कंपन्याना काम दिलं होतं, या धरणाचा मुख्य कॉन्ट्रॅक्टर ही HCC (हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनी होती तर बाकी या सर्व सब कॉन्ट्रॅक्टर कंपन्या होत्या, बघताबघता खोलवर पाया खांदून झाला, संपूर्ण पाया पूर्ण खडक लागेपर्यंत खाली खोदला, नदीतल्या मुख्य प्रवाहातला पाया जमिनी लेव्हल पर्यंत भरून घेतला, एका बाजूनं वळण करून पाण्याला वाट मोकळी केली, पायाच्या थोडं वरच्या बाजूला पाणी अडवून त्याचा बांधकामासाठी उपयोग करत होते, डोंगरात खाणी काडून काळाकुट्ट दगड धरणावर आणत होते आणि सिमेंट काँक्रीट च धरण उभं राहत होतं,


लाभक्षेत्रात जमिनी संपादन करायला सुरवात झाली, एकूण 7 टी एम सी चा पाणीसाठा त्यापैकी 40% पाणी तारळे विभागाला तर 60% पाणी मान खटाव दुष्काळी भागाला, तारळे विभागात फक्त नदी काठापासून 100 मिटर हेड निश्चित करण्यात आला आणि तेवढेच क्षेत्र ओलिताखाली येणार हे निश्चित झालं त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या गावातील जमिनी फक्त संपादित झाल्या, तारळे विभागातील नदी पासून दूर असलेली अनेक गावं या पाण्यापासून वंचित राहिली त्यामुळे जमीन संपादन कमी झाले, सरकारने काही गावं मान खटाव ला बसावी यासाठी आग्रह धरला पण मान खटाव ची दुष्काळ परिस्थिती लोकांनी पाहिली होती म्हणून जवळ विभागात गावे बसण्यासाठी चढाओढ चालू झाली यातूनच काही गावे वसली पण अजूनही इथले प्रकल्पग्रस्थ आपल्या मूलभूत अधिकारा पासून दूर आहेत, अनेकवेळा धरणाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न झाला लोकांना आश्वासनाची चिरीमिरी देऊन काम रेटवल गेलं, असं करता करता 2004 पर्यंत बहुतेक गावं उठून गेली जी शिल्लक राहिली त्यांचीही परवड झाली आणि हळू हळू उंची वाढवत गावाच्या जवळ पाणी यायला लागलं, शेवटी एकी संपली ताकत कमी पढू लागली आणि 2010 ला प्रशासनाने पूर्ण पाणीसाठा करून आपले दुष्कार्य पार पाडले आणि उर्वरित सर्व प्रकल्पग्रस्थ आपल्या हक्काच्या शोधात अजून पण रोजगार करत आहेत. कोणाला गावठाण मिळाली तर काही खातेदार अजूनही वंचित आहेत,  25 वर्षांपासून काही खातेदारांना अजून एक गुंठा जमीन मिळाली नाही, ज्यांना मिळाली तीही अपुरी तर काही कोर्ट केस काहींना अटकावं होतोय, काहींना बांधवरून जाऊ दिलं जात नाही, उर्वरित गावं मायणी जवळ वसली तिथली परिस्थिती तर या सर्वाहून भयानक आहे, हे सर्व पाहून आणि अनुभवून वयाची 80 - 90 पार करणारी आमची म्हातारी माणसं 60-70 रीत आमची साथ सोडू लागली.


हे सर्व आठवलं तर मनात काहूर माजून मन अगदी गलबलून जातं, तिथला ऊन वारा पाऊस हवा पाणी याला तोड न्हवती फक्त शिवारातन फिरून आलं तरी मन प्रसन्न व्हायचं, आपलाच गावं आपलाच शिवार सर्व काही हक्काचं वाटत होत, अनेकांची खूप वाताहत झाली अनेक गावांचे तुकडे झाले, खूप वेदना होतात मनाला, होत काय आणि झालं काय? असो आमची पुढची पिढी नक्कीच हे विसरणार नाही आणि कष्टाळू बापजाद्याचं अंगात रक्त असल्यामुळे आता पण कुठंही कमी नाहीत आणि भविष्यात नक्कीच गरुड झेप घेतील यात शंका नाही, खूप आठवणी राहिल्या आहेत पुस्तकं लिहिली तरी कमीच पडतील, 90 च्या अगोदर च्या पिढीने हे सर्व जगलं आहे आणि म्हणूनच खूप आदर वाटतो त्या मातीचा🙏

धरणात बाधित झालेली गावं आणि त्यांचं पुनर्वसन:-

डांगीष्टेवाडी -, आता देवाचा चा माळ (मुरुड) आणि सुंदर नगर (आंबळे जवळ) तर काही घरं आदर्शनगर पाली जवळ वसले

दुडेवाडी :- आताचे आदर्शनगर (पाली जवळ) वसले आहे 

निवडे आता राहुडे जवळ वसले आहे

सावरघर :- तारळे आणि चोरे जवळ

भांबे:- वडगाव जवळ

कुशी :- आवर्डे, तारळे नवलाई चा माळ आणि मायणी जवळ

करंजोशी :- गणेशखिंड गणेशवाडी जवळ

बोपोशी आणि खालची पवारवाडी:- मायणी जवळ

अश्याप्रकारे आज ही गावं वसलेली पाहायला मिळतात.


लेखक:- बाळासाहेब सपकाळ (Manager Exports @ Modison Limited, Nariman point) – राहणार:- कामोठे नवी मुंबई, मूळ गाव:- सावरघर ता पाटण

Contact 9076166405

No comments:

Post a Comment

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...