ययाती
महाराष्ट्र
साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात ययातीचे नाव
अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.
ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट
रचना. वाचून झालं की हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या
आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी,
शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो
गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात
गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय त्यांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना
एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि
अपुरे राहते.
कामवासना हा या
कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो ,
त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात
अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी
पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी
शेवटपर्यंत राहतात.
यातला कच हा आधुनिक काळातल्या
आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला
खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे.
आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष
प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले
असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली
प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत
संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे.
देवयानी या पात्राचे
तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक
आहे बघा ! आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश
मुले ध्येयहिनच असतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच
होतं. कुठलाही योग्य निर्णय न घेता , पुरेसा
विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी
देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक
- मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी
आणि अविचारी लहान पोर दिसून येते.
आणि कदाचित याच कारणामुळे ययाति
शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व
शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतःच्या एका चुकीमुळे
ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग
करते , हे धाडसच !
कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत
स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची
कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत
वाक्ये.. खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे.
कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती
भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा
मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात.
कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होतं !
वाचताना आपण प्रत्येक पात्राशी
समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं आपल्या अंतर्मनात राग ,
द्वेष , मत्सर , अश्रू ,
दया , कणव , करुणा ,
आसुया या भावना युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं
अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा
प्रयत्न करतं.
काही कादंबऱ्या मादक असतात. त्या
भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच
पट्टीतल्या.
ययाती समजून घ्यावी लागते !
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही
कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी.
यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत.
कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक
गोष्टी कळतील , समजतील , नव्याने
उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी !

No comments:
Post a Comment