30 January 2022

गांधी का मारत नाही

गांधी का मरत नाही
लेखक - चंद्रकांत वानखेडे

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधींची तीन गोळ्या झाडून हत्या केली. स्वातंत्र्य मिळून अवघे ५ महिने झालेले असताना ज्या माणसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली त्याची अशाप्रकारे हत्या झाल्यामुळे सर्व देश शोकसागरात बुडाला. पण देशातील काही तथाकथित उच्चवर्णीय मात्र या घेटनेने भलतेच आनंदित झाले. गांधींची हत्या झाल्याच्या आनंदात त्यांनी पेढे देखील वाटले. त्याला त्यांनी गांधीवध असे गोंडस नाव दिले. पण क्रियेला प्रतिक्रिया म्हणून अनेक ठिकाणी या उच्चवर्णीयांची घरे जाळण्यात आली. ज्या माणसाने आयुष्यभर जगाला अहिंसेची शिकवण दिली त्याच्या नावाने असा हिंसाचार होणे खरेच दुर्दैव होते. पण त्यासाठी देखील या उच्चवर्णीयांनी नथुरामला दोषी न ठरवता गांधींनाच दोष दिला. पुढे कोर्टात गांधी हत्येचा खटला उभा राहिल्यावर नथुरामने कोर्टात आणि त्याच्या अनुयायांनी कोर्टाबाहेर गांधी हत्येचे समर्थन करण्याचा खूप प्रयत्न केला. नथुरामला खरा ठरवण्याचे आणि गांधीला बदनाम करण्याचे प्रयत्न गांधी हत्येच्या ७४ वर्षां नंतरही जोमाने चालू आहेत. पण तरीही या सगळ्यांना पुरून उरत गांधी नावाचा म्हातारा करोडो भारतीयांच्या मनात का जिवंत आहे आणि त्याला मारण्याची खरी कारणे नक्की होती तरी कोणती याचा सांगोपांग उहापोह लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या 'गांधी का मरत नाही' या पुस्तकात केलेला आहे.

१९१६ साली गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले तेव्हा स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्रे लोकमान्य टिळकांकडे होती. १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर ही सूत्रे गांधींकडे आली. पण त्यापूर्वी 'ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्य पेशव्यांकडून म्हणजे ब्राह्मणांकडून हिरावलेले असल्यामुळे ते परत घेण्याची जबाबदारी आणि हक्क ब्राह्मणांचाच आहे' असे मानणारा मोठा वर्ग स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत होता. पण त्यामुळे स्वातंत्र्यलढा केवळ काही उच्चवर्णीय लोकांपुरता मर्यादित राहून समाजातील बहुसंख्य गोरगरीब जनतेचा त्यातील सहभाग खूप अल्प होता. गांधीनी मात्र स्वातंत्र्य कशासाठी व कोणासाठी तर या देशातल्या शेवटच्या माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी जनतेसाठी व त्यांच्या सुखासाठी असे म्हणायला सुरुवात केली. त्यांनी मुंबई, दिल्ली, पुणे यासारख्या शहरातील स्वातंत्र्य लढा चंपारण्य, खेडा यांसारख्या ग्रामीण भागात पोहोचवला.  ज्या अस्पृश्यांना समाजात देखील दुय्यम स्थान होते त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घ्यायचे महत्त्वपूर्ण कार्य गांधीजींनी केले. 'अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील डाग आहे' असा ठराव नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. एकूणच काय तर ज्या शुद्रातिशूद्रांना प्रतिष्ठा नाही, त्यांच्या श्रमाला किंमत नाही आणि ज्यांना स्वतःला किंमत नाही त्या सर्वांना सन्मान, किंमत आणि प्रतिष्ठा मिळवून देणे हाच गांधींच्या स्वातंत्र्याचा अर्थ होता आणि ध्यासही होता. गांधी असा स्वातंत्र्य लढ्याची ढाल करत सामाजिक परिवर्तन करू लागल्यामुळे वर्णवर्चस्व आणि वर्ण श्रेष्ठत्वाचा दंभ असलेल्या उच्चवर्णीयांमध्ये पोटशूळ निर्माण होणे साहजिकच होते. गांधी बद्दल घृणा निर्माण व्हायला सुरवात तेथूनच झाली. 'एखादया वकिलाच्या कामाइतकीच न्हाव्याच्या कामादेखील किंमत आहे, कारण आपण करतो त्या कामातून उदर निर्वाह मिळवण्याचा अधिकार सर्वानाच आहे' असे ते म्हणत. त्यामुळे प्रत्येकाने आपली जात न पाहता शरीरश्रम केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे जन्माच्या आधारावर मिळालेले श्रेष्ठत्व गांधी कर्माच्या आधारे घालवू पाहत असेल तर त्यालाच या जगातून घालवलेला बरा अशी भावना हिंदुत्ववाद्यांच्या मनात निर्माण न होती तर आश्चर्यच. त्यात त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे अशाप्रकारे कर्मसंकर आणि वर्णसंकर करणारा गांधी उच्च वर्णीयांना रुचणार तरी कसा. 

गांधी मुस्लिम धार्जिणे होते, मुसलमानांना नेहमी झुकते माप देत असल्यामुळेच फाळणी झाली आणि पाकिस्तानला ५५ कोटी पण गांधीमुळेच द्यावे लागले असा युक्तिवाद गोडसे समर्थकांकडून नेहमीच केला जातो. गंमत म्हणजे १९१६ साली लखानौ तेथील अधिवेशनात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे कबूल टिळकांनीच केले होते. भलेही त्यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी त्यांनी अपरिहार्यपणे ते मान्य केले असेल. पण भविष्यातील पाकिस्तान निर्मितीची बीज त्यातच होती. पण म्हणून कोणी टिळकांना मुस्लिम धार्जिणे म्हणत नाही. हिंदुत्ववादी गांधींना मुस्लिम धार्जिणे म्हणत असताना मुस्लिम लीगला मात्र तर मुस्लिम विरोधी वाटत असतं. एकच माणूस एकावेळी दोन्ही कसे काय असू शकतो? लेखक म्हणतो, 'गांधी असलाच तर केवळ माणूसधार्जिणा होता. जात, धर्म, भाषा, प्रांत, देश याची कोणतीही चौकट न मानता, बंधनात न अडकता , बंधना पलीकडे जाऊन तो केवळ माणसांवर प्रेम करणारा होता.' गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत असतं. ते म्हणत, 'मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करत असल्याने , मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे'. अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणे म्हणजे हिंदू धर्म, हीच त्यांची हिंदू धर्माची व्याख्या होती. गांधी अस्पृश्यता निवारण्यासाठी प्रयत्न करतात, हरिजनांच्या मंदिरप्रवेशासाठी चळवळ चालवतात; म्हणून गांधी धर्मच बुडवायला निघाला आहे या द्वेषातून काही धर्म मार्तंडांनी १९३४ साली हरिजन यात्रेच्या दरम्यान त्यांच्यावर पहिला प्राणघातक हल्ला केला. 

नथुरामने केवळ ५५ कोटींचा बदला म्हणून गांधींचा खून केला असता तर त्याआधी त्यांच्यावर ३ प्राणघातक हल्ले का करण्यात आले? ते ५५ कोटी देखील फाळणीच्या वेळी रिझर्व्ह बँकेच्या शिल्लक असलेल्या रकमेचे वाटप झाले त्यातीलच होती. पाकिस्तानच्या निर्मितीचे नथुरामला एवढेच वाईट वाटत होते तर पाकिस्तान निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या महमद अली जीना यांना न मारता त्याने गांधींना का मारले? याचे उत्तर मात्र त्याचे समर्थक देऊ शकत नाही. कारण गांधी हत्येचे खरे कारण तात्कालिक नसून स्वातंत्र्य लढ्यातील अभिजनांचे वर्चस्व झुगारून बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याद्वारे सुरू केलेली अस्पृश्यता निवारण्याची सामाजिक क्रांती हेच होते. एकट्या गांधींमुळे हिंदुस्थानातील विविध समाज समूह जेवढे जवळ आले, तेवढे पूर्वी कोणाही पुढाऱ्यांमुळे आले नाहीत. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, अस्पृश्य, स्त्रिया यांना स्वातंत्र्याच्या केंद्रस्थानी आणि पर्यायाने सत्ताकेंद्राच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न गांधीनी केला आणि दुर्दैवाने तेच त्यांच्या हत्येचे कारण बनले. 
 
गांधीहत्या होऊन आज ७४ वर्ष झाली. पण गांधींची मोहिनी अजूनही केवळ भारतावरच नाही तर जगावर आहे. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, विनोबा भावे, साने गुरुजी, सरोजिनी नायडू, आचार्य कृपलानी, महादेवभाई देसाई यांसारखे नेते तर त्यांचे शिष्य होतेच पण घनश्याम बिर्ला , अंबालाल साराभाई, जमनालाल बजाज, प्राणजीवन मेहता यांसारखे उद्योगपती देखील होते. गांधीनी मानव जातीला समूहाच्या संघर्षाचे एक अभिनव आणि सुसंस्कृत साधन दिले, त्याचे नाव सत्याग्रह. त्यामुळेच जगभरात त्यांचे अनुयायी निर्माण झाले. मार्टिन ल्युथर किंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ, नेल्सन मंडेला, डेस्मंड टूटू, हो चिन मिन्ह पासून ते अगदी अलीकडचे दलाई लामा, आंग की स्यून, बराक ओबामा या सर्वांचे प्रेरणास्थान महात्मा गांधी आहेत. जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन तर एवढे म्हणाले होते की, 'असा कोणी हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर जन्माला आला होता यावर पुढील पिढ्यांना कदाचित विश्वास बसणार नाही'. गांधीजींचे अहिंसा आणि सत्याग्रह तत्व काय कमाल करू शकते हे आपण नुकतेच शेतकरी आंदोलनात पाहिले. एक वर्ष थंडी पाऊस उन यांची पर्वा न करता सामान्य गरीब शेतकरी दिल्ली सीमेवर बसून राहिले आणि शेवटी त्यांच्या समोर सरकारला झुकावेच लागेल. व्यक्तिगत पराक्रम गाजवण्यापेक्षा समुहाचा पराक्रम जागवणे खूप अवघड कार्य आहे. पण ते गांधीनी केले. भारतीय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकशाही पोहचवण्याचे महान कार्य गांधीनी केले. त्यामुळेच कदाचित आज आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. दुर्दैवाने गांधींचे विचार संपण्याचा सर्वाधिक प्रयत्न भारतातच सध्या सुरू आहे. विशेषतः गेल्या ७ वर्षात नथुरामचे उदात्तीकरण आणि गांधींची बदनामी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. पण आपण हे प्रयत्न हाणून पाडायला हवे. त्यासाठी गांधी वाचायला हवा. वानखेडे सरांनी अगदी सहज सोप्या भाषेत गांधी का मरत नाही आणि तो का मरणार नाही याची मुद्देसूद मांडणी केलेली आहे. गांधीं बद्दलचे सारे गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यां पर्यंत पोहचवण्यासाठी  'गांधी का मरत नाही' हे पुस्तक तुम्ही वाचाच.

No comments:

Post a Comment

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौ...